कोल्हापूर- देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये 9 सप्टेंबर रोजी स्थगिती मिळाली. तेव्हापासून आत्तापर्यंत मराठा समाजातील प्रक्षोभ लक्षात घेऊनसुद्धा कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचे मातेरे झाले आहे. त्यातच राज्य सरकारने एसईबीसी आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गातून सरकारने प्रवेश सुरू केले, हे धक्कादायक आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. घटनातज्ञांना घेऊन न बसता सरकार निर्णय घेत आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असले तर सुपर निमोरीकल वापरले पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय यावेळी सेनेचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा त्यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आरक्षणासंदर्भात जर सांगितले, भाजपने नेतृत्व करा तर बघा आम्ही काय करतो मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. सर्व मराठा समाजाने सांगितले की, आंदोलनाच नेतृत्व भाजपने घ्यावे तर आम्ही ते घ्यायला तयार आहे. शिवाय मराठा समाजाने आमच्याकडे नेतृत्व दिलेच तर आम्ही आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला सळो की पळो करू, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले.
हे सरकार अभ्यास करायला तयार नाही -
माझ्याकडे महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा रात्री 3 वाजेपर्यंत महसूल विभाग काय हे समजून घेण्यासाठी बसत होतो. मात्र, आत्ताच्या सरकारमध्ये हे पाहायला मिळत नाही. आत्ताचे सरकार अभ्यास करायलाच तयार नसल्याची टीका सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ठाकरे सरकारवर केली.
उद्धव ठाकरे राज्य चालवायला जन्माला आलेले नाहीत
नेत्यांची व्याख्या ही वाहून नेणे अशी होते. मात्र, ठाकरेंना प्रश्न सोडविण्याची गरज वाटत नाही. उद्धव ठाकरे हे पक्ष चालविण्यासाठी जन्माला आले आहेत. ते राज्य चालविण्यासाठी जन्माला आले नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील संघटन चालवले. उद्धव ठाकरे देखील संघटन चालवित होते, मात्र ते अचानक मुख्यमंत्री झाले.
संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याला प्रत्युत्तर -
प्रताप सरनाईक यांच्या विविध मालमत्तांवर 'ईडी'ने छापा टाकला. त्यानंतर यामागे भाजपचाच हात आहे, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मी सुद्धा 120 जणांची यादी अर्थमंत्रालायाकडे देणार आहे. त्यानंतर किती जणांवर कारवाई होते बघू, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ते खूप अतिशय चांगले करत आहेत. त्यांचा निर्णय अतिशय उत्तम आहे. तुम्ही तत्काळ 120 मध्ये एक वाढवून 121 पाठवा. तुमचे हात कोणीही बांधून ठेवलेले नाहीयेत. धमकी द्यायचे बंद करा, धमकी द्यायचे दिवस गेले. आम्ही आमच्या मागे कफन बांधूनच आहे. त्यामुळे जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल.