कोल्हापूर :राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने समर्थन दिल्यानंतर राज्यात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. या शपथविधीमध्ये पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. कागल मतदार संघातील घाटगे यांचे कट्टर विरोधक हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर कोल्हापूर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन घाटगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आज कागल शहरात कागल मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन समरजीतसिंह घाटगे यांनी आपली भूमिका मांडली.
फडणवीस, चंद्रकांतदादा माझे राजकीय गुरू :रविवारी शपथविधीनंतर 'मी' तातडीने मुंबईसाठी निघालो होतो. मात्र, सातारापर्यंत पोहोचल्यावर मला कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे फोन आले. यामुळे 'मी' फोन स्विच ऑफ केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सातत्याने संपर्कात होतो. फडणवीस यांच्याकडे एकतास चर्चा झाली. गुरुपौर्णिमेला त्यांच्याकडे गेलो होतो. फडणवीस आणि चंद्रकांतदादा माझे राजकीय गुरू आहेत, असेही घाटगे यावेळी म्हणाले.