कोल्हापूर - दरवर्षी प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी एखादी खास राखी बाजारात मिळते का पाहतच असते. अनेक राखी पाहून शेवटी एखादी पसंत पडलेली राखी घरी आणून रक्षाबंधन दिवशी आपल्या भावाला बांधतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात काही निसर्गप्रेमींनी एकत्र येत अशा काही राखी बनवल्या आहेत ज्या प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला बांधाव्या अशाच आहेत. 'बीजराखी', असे या राखीचे नाव असून कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ही संकल्पना पुढे आली आहे.
बीजप्रसार आणि बीजारोपणासाठी 'बीजराखी' संकल्पना आली पुढे
आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, वृक्षारोपण केले पाहिजे, याबाबत जनजागृती करून संवर्धनासाठी हातभार लावला पाहिजे, असे अनेकजण बोलत असतात. अनेकजण आपापल्यापरीने पर्यावरणासाठी काम करतानाही पाहायला मिळतात. कोल्हापुरातील 'वर्ल्ड फॉर नेचर'चे अभिजीत वाघमोडे सुद्धा गेल्या काही वर्षांपासून संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवून यामध्ये काम करत आहेत. नुकतीच त्यांनी रक्षाबंधन निमित्त 'बीजराखी' ही संकल्पना पुढे आणली आहे. बीजप्रसार आणि बीजारोपणासाठी त्यांनी ही संकल्पना समोर आणली असून राखीला विविध फळांझाडांची तसेच वृक्षांच्या बिया लावण्यात आल्या आहेत. पर्यावरणाला घातक असणाऱ्या कोणत्याही घटकांचा यामध्ये उपयोग करण्यात आला नसून पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करून आकर्षक राखी बनविल्या आहेत. जेव्हा रक्षाबंधन असेल तेव्हा बहीण आपल्या भावाला ही 'बीजराखी' बांधले आणि रक्षाबंधननंतर राखी फेकून देण्याऐवजी हीच राखी आपल्या घराशेजारी किंवा कुंडीमध्ये ठेवता येईल. जेणेकरून आपोआपच बीजप्रसार तसेच बीजारोपण होईल, अशी ही संकल्पना आहे. अभिजित वाघमोडे यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य या राखी बनविण्यात व्यस्त असून रक्षाबंधनला वेळ कमी राहिल्याने या 'बीजराखी'चे किटही ते सर्वजण नागरिकांना वाटत आहेत.
बीजराखी सर्वांसाठी मोफत