कोल्हापूर - महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरणाला ओळखले जाते. सध्या या धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे येथील एक ऐतिहासिक ठिकाण पर्यटनासाठी खुले झाले आहे. 'बेनझीर व्हीला' असे या ऐतिहासिक स्थळाचे नाव आहे.
राधानगरी धरणाच्या उभारणीचा साक्षीदार असलेला हा 'बेनझीर व्हीला' २ वर्षानंतर खुला झाला आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटकांची पाऊले आता या पर्यटनस्थळाकडे वळत आहेत. हा बेनझीर व्हीला धरणाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर असल्याने जेव्हा पाणी कमी होते तेव्हाच याठिकाणी जाता येते. जेव्हा पाणी कमी होते, तेव्हा परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने हा व्हीला पाहण्यासाठी याठिकाणी येत असतात. सध्या या वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक अशा शाहूकालीन वास्तूंचे जतन करण्याची मागणी करत आहेत.
'बेनझीर व्हीला' पर्यटकांसाठी खुला या ऐतिहासिक बेनझीर व्हीलाला 100 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. अशा प्रकारच्या वास्तूंचे खरतर जतन करण्याची गरज आहे. पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू नेहमी शाहूंची आठवण करून देते. अशा या वास्तू शासनाला जतन करता येत नाहीत ही खेदाची बाब असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी पाण्याचे महत्त्व ओळखून राधानगरी धरण बांधण्याला प्राधान्य दिले. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी धरणाला ओळखले जाते. 1910 ला या धरणाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. तेव्हाच या धरणाच्या मधोमध असलेल्या छोट्या बेटावर अतिशय देखणी अशी एक वास्तू उभारण्यात आली. त्याचे नाव आहे बेनझीर व्हीला. धरण बांधकाम देखरेखीखाली राहावे यासाठी अनेकवेळा शाहू महाराज स्वतः याठिकाणी वास्तव्यासाठी असायचे. शिवाय बांधकामावेळी ज्या-ज्या तज्ज्ञ आणि महत्वाच्या व्यक्तींनी यासाठी योगदान दिले तेसुद्धा याठिकाणी वास्तव्यासाठी असायचे.