कोल्हापूर - महाराष्ट्रातील महत्वाच्या गडकिल्ल्यांपैकी एक महत्वाचा गड असलेल्या पन्हाळ्याकडे ( Panhala fort Kolhapur ) आता प्रशासनासह पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ऐतिहासिक बुरुज आणि वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. नुकतेच चार दरवाजा जवळील नेबापुर व मंगळवार पेठकडे जाण्याच्या पायवाट मार्गावरील ऐतिहासिक तटबंदीचा काही भाग कोसळला. तर तटबंदीला जागोजागी भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे 'पन्हाळा गड वाचवा' असेच म्हणण्याची वेळ आता आल्याच्या भावना नागरिकांमधून उमटत आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून डागडूजी करून पन्हाळा गडाचे संवर्धन करण्याची गरज असल्याची भावना दुर्ग संवर्धक आणि नागरिकांनी केली आहे.
'...तर गडावरील महत्वाच्या वास्तू नामशेष होतील' :दरम्यान, पन्हाळा किल्ल्याला महाराष्ट्रात आणि मराठा साम्राज्याच्या एक गौरवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच पन्हाळा गडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे अनेकदा मोठ्याप्रमाणात गडावरील वास्तूंची, बुरुजांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता सुद्धा दोन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने नाक्याजवळील चारदरवजाच्या जवळील तटबंदीच्या भिंतीचा काही भाग काल कोसळला. उर्वरीत अवशेषापैकी पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर, मंगळवार पेठ गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवरील शिलाहार भोज राजाच्या काळात बांधली गेलेली ही भिंत आहे. या जवळच गत वर्षी मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाल्याने रस्ता खचला होता. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात भिंतीना तडे गेले आहेत. पुरातत्व विभागाने या ठिकाणाची पहाणी पण केली होती, पण निधी अभावी दुरुस्ती होवू शकली नसल्याचे सांगण्यात येते.