कोल्हापूर - मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा आम्ही विरोध करत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी कमी पडत असल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही मराठा समाजाने केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे.
अशोक चव्हाण, वडेट्टीवार अन् भुजबळांनी राजीनामा द्यावा - मराठा क्रांती मोर्चा - मराठा क्रांती मोर्चा
मराठा आरक्षणाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असताना एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र सुनावणीवर परिणाम होण्याच्या शक्यतेने मराठा क्रांती मोर्चाने या आरक्षणाचा विरोध केला आहे.
राज्याचे पुनर्वसन आणि ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ सुद्धा गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या विरोधातील वक्तव्य करत आहेत. या दोघांवर सुद्धा कारवाई व्हावी तसेच त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना देणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी म्हटले आहे.
ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टातील केस कमजोर पडेल -
मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रिम कोर्टामध्ये केस सुरू आहे, असे असताना राज्यशासनाने ईडब्ल्यूएसमधून आरक्षण जाहीर केल्यामुळे कोर्टातील केस कमजोर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून याचा विरोध असून त्याचा जाहीर निषेध करत असल्याचेही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय दिलीप पाटील यांनी म्हटले आहे.