कोल्हापूर - राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या दोघांमधील वाद कोल्हापूरकरांसाठी नवा नाही. सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबात मैत्री, दुश्मनी, दोस्ताना आणि पुन्हा वैर असा संघर्षांचा काटा नेहमीच झुलत राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. धनंजय महाडिक कोल्हापूरमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत. महाडिक आणि सतेज पाटील दोघेही आघाडीमधील नेते असल्याने सतेज पाटील गतवेळच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे वैरत्व विसरून महाडिक यांना मदत करणार का? अशी सर्वत्र चर्चा आहे.
अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह शरद पवारांनी स्वतः मध्यस्थी करून वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही बोलले जाते. पण यावेळी सतेज पाटील आपल्या निर्णयाशी ठाम असून आमचा विरोध राष्ट्रवादीला नसून महाडिकांना असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पण असे काय घडले आहे की, महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वाद एव्हडा विकोपाला गेला यावर एक नजर...
आमदार सतेज पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात महादेवराव महाडिक यांच्या सोबत झाली. सतेज पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा महाडिक यांच्यासोबत त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. पण ते फारकाळ टिकले नाहीत. पुढे दोन्ही कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला. परिणामी पुढील विधानसभेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात महादेवराव महाडिक यांनी त्यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना अपक्ष उभे केले. यामध्ये धनंजय महाडिक यांचा जवळपास ६ हजार मतांनी पराभव झाला.
महाडिक यांचा पराजय करून सतेज पाटील यांना मंत्रिपद मिळाले. नंतर स्वतः धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि दोघांमधील वाद मावळायला सुरुवात झाली. त्यावेळी धनंजय महाडिकांना राष्ट्रवादीतून कोल्हापूर लोकसभेचे तिकीट मिळाले. सतेज पाटील यांनीसुद्धा मागील मतभेद विसरून धनंजय महाडिक यांना मदत केली आणि महाडिक निवडून सुद्धा आले. पण, जसे म्हटल्याप्रमाणे कुटुंबात मैत्री, दुश्मनी, दोस्ताना आणि पुन्हा वैर असा संघर्षांचा काटा नेहमीच झुलत राहिला आहे, तेच यावेळी घडले. लोकसभेनंतर लगेचच विधानसभेची निवडणूक आली, यावेळी काँग्रेसकडून सतेज पाटील पुन्हा दक्षिण कोल्हापूरमधून उभे होते. त्यांच्या विरोधात भक्कम असा उमेदवार मिळत नव्हता. पण, महाडिक परिवारामधून अमल महाडिक हा नवीन चेहरा समोर आला आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढत सतेज पाटील यांचा पराभव केला. सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याचा दावा पाटील यांचा होता. मात्र, तरीही महाडिक यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड न करता स्वतःच्या चुलत भावाला माझ्याविरोधात उभे केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी वारंवार केला.