कोल्हापूर : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षीच्या महापुराचा वाईट अनुभव विचारात घेऊन कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील गणेश मूर्ती कारागिरांनी तयार केलेल्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात मूर्तींचा प्रश्न गंभीर बनत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी आता कुंभार बांधव करत आहेत. पंचगंगा नदी इशारा पातळीकडे प्रस्थान करत असल्याने कोल्हापुरातील गणेश मूर्ती कारागीर मात्र धास्तावले आहेत.
पूराचा फटका गणेशमूर्तींना :कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरल्या आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पुराचा फटका सर्व सामान्यांबरोबरच अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सवाची तयारी करणाऱ्या गणेश मूर्ती कारागिरांनाही बसणार आहे. 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे कोल्हापुरातील कुंभारांनी घडवलेल्या लाखो गणेश मूर्ती खराब झाल्याने कुंभारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हा अनुभव पाठीशी असताना मूर्तिकारांनी पाणीपातळी वाढत असल्याचे पाहून तयार केलेल्या मूर्ती सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आता कोल्हापुरातील कुंभार बांधव करत आहेत.