कोल्हापूर- जिल्ह्यात 'आरोग्य सेतू' या ॲपचा चांगलाच उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 596 जणांची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून या अॅपच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे संदेश, संपर्कात आलेल्या व्यक्तींना पाठविण्यात आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
भारत सरकारने कोव्हिड-19 संक्रमणाच्या संभाव्य जोखिमेबाबत कळविण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या काही सर्वोत्तम पध्दतीची माहिती देण्यासाठी आणि कोव्हिड-19 महामारीशी संबंधित काही वैद्यकीय सेवेची माहिती तसेच सल्ले देण्यासाठी आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप बनवले आहे. आरोग्य सेतू हे ॲप आपण ज्या ठिकाणी काम करतो तेथील ज्या व्यक्तींच्या आपण संपर्कात येतो. त्या सर्वांचा तपशील रेकॉर्ड करण्यास (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) उपयोगी ठरते. जर त्यापैकी कोणाचेही कोव्हिड-19 पॉझिटिव्ह म्हणून निदान झाल्यास आपल्याला कळविले जाते. या ॲपच्या माध्यमातून वापरणाऱ्यांची स्थितीबद्दल माहिती दिली जात आहे. तसेच माध्यम विभागात विविध चित्रीकरणातून जनजागृतीही केली जाते. शिवाय कोव्हिड-19 बाबत राज्य निहाय अद्ययावत माहिती सुद्धा दिली जात आहे.
एवढेच नाही तर 'ई पास' बाबतही माहिती यावर दिली जाते. सद्यस्थितीत 12 कोटी 58 लाख भारतीय, हे ॲप वापरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या 3 लाख 6 हजार 869 इतकी आहे. जिल्ह्यातील 678 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 36 रुग्ण या ॲपचा वापर करत आहेत. तर 1 लाख 23 हजार 950 व्यक्तींनी या ॲपच्या माध्यमातून स्वत:ची माहिती अपडेट केली आहे.