कोल्हापूर - शहर स्वच्छता आणि सौंदर्याचे निकष उंचावण्यासाठी कोल्हापूरकरांनी आजपासून नव्या मोहिमेला सुरुवात केली आहे. 'माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' मोहिमेला आज ताराराणी चौकातून सुरुवात करण्यात आली. हातात फलक घेऊन मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी थुंकीमुक्त कोल्हापूर करण्याचा संदेश दिला. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांना नागरिकांना जाब विचारात त्यांनाच ती थुंकी पुसण्यास लावली.
'माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' चळवळीला सुरुवात - कोल्हापूर स्वच्छता न्यूज
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या स्वच्छता चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूरकर पुढे सरसावले आहेत. आजपासून शहरात 'माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' चळवळीला सुरुवात करण्यात आली.
!['माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' चळवळीला सुरुवात Don't Spit](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8956381-819-8956381-1601190094724.jpg)
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदावर आल्यापासून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. दर रविवारी स्वच्छता मोहीम राबवून शहरातील हजारो टन कचरा ते या मोहिमेच्या माध्यमातून काढत असतात. त्याचे अनेक फायदे कोल्हापूरला झाले आहेत. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी, शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी आणि रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आता कोल्हापूरकरांनीही आपले योगदान देण्याचे ठरवले आहे.
त्यांनी 'माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर' ही मोहीम सुरू केली आहे. 'एक दिल एक जान, देऊ स्वच्छतेकडे ध्यान', 'एक पिचकारी आयुष्याचा नाश करी' असे पोस्टर हातात घेऊन जनजागृती करण्यात आली. करवीरनगरीपासून सुरू होणारी ही मोहीम यापुढे शहराच्या सर्व भागात व पूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा मनोदय कोल्हापूरकरांनी केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक दंडनीय गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या लोकांवर चाप लावण्याचा प्रयत्न ही मोहीम करेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिप्पूरकर यांनी व्यक्त केला. मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवून कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनवावे, असे आवाहन देखील दीपा यांनी केले.