कोल्हापूर -किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरचं आहे. मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना मुंबईसोबत उभी राहिली आहे. हे मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे. मुंबईच्या जनतेला माहीत आहे की कोणाला साथ द्यायची, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
भाजपाने ‘भाजाप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेवर टीका केली होती. आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपाच्या दादरमधील वसंतस्मृती येथील कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र आगामी काळात महानगरपालिकेवर भगवा असेल, पण तो शिवसेनेचा नसेल. असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अनिल परब यांचे फडणवीसांना जोरदार उत्तर -
याला शिवसेना नेते अनिल परब यांनीसुद्धा जोरदार उत्तर दिले. खूप जण आले, खूप घोषणा केल्या. मात्र मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या वाईट प्रसंगात शिवसेना उभी राहिली आहे. कुणाची साथ द्यायची हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे ते स्पष्ट होईल.
काय म्हणाले होते फडणवीस?
महाविकास आघाडीसरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. जो गरिबांकरता काम करतो, त्यांच्यापाठी लोक उभे राहतात. मागच्या पाच वर्षात अनेक अडकलेली काम मार्गी लावली आहेत. कोस्टल रोड तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. रो-रो सेवा सुरू केली. बीडीडी चाळ प्रकल्प सुरू केला. सरकार एलअँडएनटी कंपनीला मदत करायला तयार नाही. धारावीचा प्रश्न आम्ही सोडवला. मेट्रोचे मोठे नेटवर्क उभे केले. मात्र हे सरकार विश्वासघातकी असल्याची टीका फडणवीसांनी केली.