कोल्हापूर - खोदकाम करताना अनेकदा जुन्या काळातील वस्तू, अवजारे, नाणी सापडल्याची उदाहरणे आपण ऐकली आणि वाचलीही असतील. मात्र, खोदकामानंतर चक्क एक एकर परिसरात पसरलेले पुरातन तळे करवीर तालुक्यातील वाकरे गावात सापडले आहे. सौरऊर्जेचा प्रकल्प उभा करत असताना सुरू असलेल्या खोदकामावेळी चक्क जुन्या काळातील भल्या मोठ्या तळ्याचा शोध लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या ठिकाणी दलदल होती. त्याठिकाणी इतका मोठा पौराणिक ठेवा सापडल्याने आता सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. याठिकाणी काही जुन्या वस्तूही सापडत आहेत.
तळे बाराव्या शतकातील असल्याचा अनेकांचा अंदाज
कोल्हापूर शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील वाकरे गावात खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून सौरउर्जा प्रकल्प उभा करण्याचे काम सुरू होते. यासाठी सुरुवातीला गावातील दलदलीच्या परिसरात खोदकाम करून त्याठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभा करायचे नियोजन होते. पण, त्यानुसार त्या दलदलीच्या ठिकाणी खोदकामाला सुरुवात झाली असता काही फूट खोल गेल्यानंतर जांभ्या खडकांच्या पायऱ्या असल्याचे दिसून आले. बघता बघता एक मोठे जुने तळे असल्याचे स्पष्ट होऊ लागले. दरम्यान, अनेकजण त्या ठिकाणी तळे होते असे सांगतात. त्यामुळे अनेकवेळा गाळ काढण्याचे प्रयत्न झाले. पण, पुन्हा काही कारणाने ते काम तसेच बंद पडले होते. आता मात्र या दलदलीत दडलेला मोठा ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे.
20 हजार ट्रॉली गाळ काढला