कोल्हापूर :राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. यामुळे भोगावती नदीत होणारा विसर्ग ही थांबला असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 40 फूट 4 इंचावर स्थिर आहे. पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या 82 बंधाऱ्यांपैकी 14 बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
वीज निर्मितीसाठी विसर्ग सुरू: गेल्या दहा दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला सर्वदूर झोडपून काढले, जिल्ह्यातील भोगावती, कुंभी, कासारी, वारणा, दूधगंगा या नद्यांना पूर आला मात्र जिल्ह्यात कुठेही सुदैवाने पूरस्थिती निर्माण झाली नाही, गेल्या चार-पाच दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली होती मात्र धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता, शुक्रवारपासून या पावसात घट झाल्याचे दिसून आले आणि यामुळे स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून आता वीज निर्मितीसाठीचा 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ऐतवडे पूल पाण्याखाली : परिस्थिती स्थिर राहिल्यास आज पासून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याला सुरुवात होईल. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ पुराचे पाणी आले आहे. मात्र या ठिकाणाहून वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, तर वारणा नदीवरील ऐतवडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
काळम्मावाडीत 64% पाणीसाठा :जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व लघु मध्य प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत मात्र 25 टीएमसी पाण्याचा साठा असलेले काळम्मावाडी धरण 64 टक्के म्हणजेच 483.14 दशलक्ष घनमीटर इतके भरले असून अजूनही धारण भरण्याला पावसाची गरज भासणार आहे. या धरणाच्या पाणीसाठावरच गोकुळ शिरगाव कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत यासह जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.
कळंबाच्या पाणी साठ्यात वाढ :दुधगंगा नदी काठावरील नागरिकांना धरण भरण्याची धास्ती लागली आहे. कोल्हापूर शहरातील काही उपनगरांना पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव अती पाणी उपसा झाल्यामुळे कोरडा पडला होता, मात्र जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने आता हा तलाव भरण्याच्या स्थितीत असून तलावाची पाणी पातळी 27 फुटांवर पोहचली आहे, येत्या दोन दिवसात हा तलाव भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.