कोल्हापूर - केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा आणि कामगार कायद्याविरोधात आज कोल्हापूर येथे भाजपाविरोधी सर्वपक्षीयांनी आंदोलन केले. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पायउतार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा घोषणा देत आंदोलकांनी मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाल्याने, काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कामगार कायद्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन, पोलीस आणि आंदोलकांमध्ये खडाजंगी 'स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला 'किमान हमी भाव' द्या'
दिल्लीच्या सीमेवर (26 मे 2019) रोजी सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने झाले आहेत. तर, कामगारांच्या देशव्यापी आंदोलनालाही आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. तसेच, (26 मे 2014) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यालाही सात वर्षे पूर्ण होत आहेत. या सात वर्षाच्या काळात शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना मोदी सरकारने देशोधडीला लावल्याचा आरोप डाव्या संघटनांसह सर्वविरोधी पक्षांनी केला. शेतकरी विरोधी तीन काळे कायदे परत घ्यावेत, कामगार विरोधी कायदे संहिता परत घ्यावी, शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार 'किमान हमी भाव' देण्याचा कायदा करावा, अशा मागण्या करत आज सर्वपक्षीयांनी कोल्हापूर येथील बिंदू चौकातआंदोलन केले.
देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढण्याला मोदींचे बेजबाबदार धोरण कारणीभूत आहे. सतत मोठ्या-मोठ्या घोषणा करतात. मात्र, त्यांची अंमलबजावणी शून्य आहे. हे नाकर्ते धोरण देशातील लाखो लोकांच्या जीवावर उठले आहे. आतापर्यंत 45 वर्षावरील अर्ध्या लोकांचेही लसीकरण झालेले नाही, अशी टीका या संघटनांनी केली आहे. तसेच, आंदोलन चिरडण्याला कारणीभूत असलेल्या जिल्हा पोलीस प्रशासनाचाही आंदोलकांनी यावेळी निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राज्यात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्याला हत्तीचे बळ मिळेल. येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नक्कीच सत्तेवरून खाली खेचले जाईल, असा इशाराही या आंदोलनकांनी यावेळी दिला.
हेही वाचा -पहिल्याच दिवशी आर्थिक मदतीसाठी २२ हजार रिक्षा चालकांचे अर्ज