कोल्हापूर -उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे सोमवारी 14 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट राज्यात तसेच देशात सर्वाधिक असल्याने, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून इथल्या कोरोना परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली, ते गडहिंग्लज येथे बोलत होते.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट सरासरी 15 टक्क्यांपर्यंत
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविडबाधीत रुग्णांचा 4 जून ते 10 जून 2021 यादरम्यान सरासरी पॉझिटिव्हीटी रेट हा जवळपास 15 टक्क्यांपर्यंत आहे. याबाबत बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या अनेक जिल्ह्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन, तिथल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शिवाय आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक असल्याने, ते आता सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंतची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 147 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 13 हजार 552 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 500 वर पोहोचली असून, कोरोनामुळे 4 हजार 95 जणांचा मृत्यू झाला आहे.