कोल्हापूरAgitation For Sugarcane Rate :गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला जादा चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, यंदाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्ह्यात आंदोलन (Sugarcane Rate Agitation in Kolhapur District) सुरू आहे. ऐन दिवाळीत आता या आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागत आहे. आंदोलकांकडून ठिकठिकाणी ऊसाचे ट्रॅक्टर, ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या पेटवून देण्याचा प्रयत्न होत आहे. आज शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे दत्त कारखान्याच्या ऊसतोडी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखल्या. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी (Farmers Leader Raju Shetty) यांनी केलेल्या मागण्यांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.
राजू शेट्टींची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड? :22व्या ऊस परिषदेमध्ये झालेल्या ठरावानुसार यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी, अशी मागणी केली गेली. यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथे ठिय्या आंदोलन करत आहेत. ऐन दिवाळीत हे आंदोलन सुरू असल्यामुळे रविवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला पाहिजे, अशी भूमिका मांडली; मात्र राजू शेट्टी यांचे विरोधक आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वाभिमानी दूध संघाच्या दरावरून शेट्टींना लक्ष्य केलं. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी राजू शेट्टी धडपडत आहेत, अशी टीका केली होती.