कोल्हापूर -हातकणंगले तालुक्यातील खोची येथील अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार ( वय 30 वर्षे, रा. खोची, ता. हातकणंगले ) यास दोषी ठरवत आरोपीला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वृषाली व्ही. जोशी यांनी सुनावली आहे.
अपहरण, अत्याचार, हत्या- हातकणंगले येथील खोची येथे दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 रोजी एका अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करून केल्याची घटना घडली होती. तर पीडित मुलीचा मृतदेह त्याचदिवशी सायकांळी गावालगतच्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या कंपाउंडमध्ये एका झाडाखाली आढळून आले होते. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी तपासी अधिकारी म्हणून पेठवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत काही तासातच आरोपी प्रदीप उर्फ बंडा पोवार यास जेरबंद केले. अवघ्या 31 दिवसात पोलिसांनी तपास पूर्ण करून संशयीता विरूध्द 225 पानी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते.