कोल्हापूर - गोकुळची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. जवळपास 2 हजार 280 मतदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघ व्यापाऱ्यांचा हातातून शेतकऱ्याच्या हातात जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आमचे संपूर्ण पॅनेल निवडणूक येईल, असेही ते म्हणाले. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक पार पडत असून आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. याचपार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील आपल्या मतदारांसोबत स्वतः पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
'आम्हाला 2 हजार 280 मतदारांची साथ; गोकुळ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हातात जाईल' - गोकुळ दूध संघ निवडणूक अपडेट
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज(रविवार) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने तगडे आव्हान उभे केले आहे.
कोरोनाग्रस्त मतदारांनाही मतदान करता येणार -
जिल्ह्यातील एकूण 70 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर जवळपास 50 ते 55 मतदार मतदान करू शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 3 हजार 656 मतदार आहेत. त्यातील तीन मतदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 3 हजार 653 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आतापर्यंत एकूण 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्या सर्वच मतदारांना शेवटच्या एक तासामध्ये मतदान करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदाराची मतदान केंद्राबाहेर तपासणी करण्यात येणार आहे. जर संबंधित मतदाराला कोरोनाची लक्षण आढळल्यास त्या मतदाराला शेवटच्या एक तासात मतदान करण्यास सांगण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या मतदान प्रक्रियेसाठी तब्बल 385 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली असून ते आपापल्या मतदान केंद्रावर मतपेट्या घेऊन रवाना झाले आहेत. मतमोजणी मंगळवारी 4 तारखेला होणार आहे.