कोल्हापूर -कोल्हापूर शहरासह जिल्हाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत जवळपास 2250 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 53 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढचे सात दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करून त्यांची गाडी सुद्धा जप्त करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी दिली.
लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. यामध्ये मेडीकल, बँका, दूध विक्री आणि फौंड्री उद्योगांना 50 टक्के कामगार क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे. याच संपूर्ण परिस्थितीचा आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी शहरातील आढावा घेतला.