कोल्हापूर -महानगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ येत्या 15 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्यावतीने गेल्या पाच वर्षातील गैरकारभाराचा हिशोब मागणीसाठी 'पंचनामा मोर्चा' काढण्यात आला. येत्या 15 दिवसात महानगरपालिकेने मागण्यांचा हिशोब दिला नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोल्हापूर महानगरपालिकेवर 'पंचनामा मोर्चा' काढण्यात आला घोटाळ्यांचा हिशोब द्या -
गेल्या पाच वर्षांमध्ये महानगरपालिकेमध्ये घरपट्टी घोटाळा झाला आहे, संपूर्ण शहर खड्डेमय झाले, पाईपलाईनची योजनासुद्धा रखडली आहे, शाळा बंद होत चालल्या आहेत, शहरातील घाणेरड्या मुताऱ्यांसह अनेक प्रश्न आजही जैसेथे आहेत. हा मोर्चा फक्त 'आप'चा नाही. हे सर्व प्रश्न घेऊन नागरिक मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने येत्या पंधरा दिवसांमध्ये या सर्व गोष्टींचा आम्हाला हिशोब द्यावा, अशी मागणी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली.
विश्वासू लोकांकडून लेखापरीक्षण करणे गरजेचे -
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येणे गरजेचे आहे. लोकांच्या गरजा सुसह्य करण्यासाठी व्यवस्था बसवणे गरजेचे आहे. आपल्या कारभारामधील त्रुटी शोधणे, यावर सुधारणा सुचवणे आवश्यक आहे. म्हणूनच गेल्या पाच वर्षातील कारभाराबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत संबंधित विभागाच्या कामाचे प्रामाणिक व विश्वासू ऑडिटर्सकडून लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. त्याची ताबडतोब चौकशी करून याचे अहवाल सर्वांसमोर मांडावेत, अशीही मागणी करण्यात अली आहे.