संजय पवार यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका कोल्हापूर Aaditya Thackeray Kolhapur Visit :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 9 आणि 10 जानेवारीला सभा घेणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट) उपनेते संजय पवार यांनी दिली आहे. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसंकल्प यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरा करणार आहेत, तर आदित्य ठाकरे देखील प्रचार सभेच्या निमित्तानं कोल्हापुरात येत आहेत. त्यामुळं सर्वांचंच या सभेकडं लक्ष लागलंय.
यावेळी बोलत असताना संजय पवार म्हणाले की, "9 आणि 10 जानेवारीला आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्यानं शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह इथं झाली. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या या सभेसाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित राहतील," असं पवार म्हणाले.
फडणवीस संभ्रम निर्माण करताय :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत संजय पवार म्हणाले की, "बाबरी मशीद पडली तेव्हा फडणवीस कुठं होते? त्यावेळी हे बिळात लपले होते. बाबरी पडली तेव्हा, शिवसेनेच्या खासदार, आमदारांवर देशभरात गुन्हे दाखल झाले. शिवसेनेचे बोट धरून हे लोक महाराष्ट्रात मोठे झालेत. शिवसैनिक होते म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई आहे. तसंच अयोध्येबाबत गृहमंत्री फडणवीस जे बोलतात ते संभ्रम निर्माण करणारे आहे" असंही संजय पवार यावेळी म्हणाले.
मुश्रीफ, महाडिक यांच्या बुलेट सवारीवरुनही लगावला टोला : कोल्हापुरातील पोलीस मुख्यालय मैदानावर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाजपाचे खासदार धनंजय महाडिक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी एकाच बुलेटवरुन चक्कर मारली होती, मात्र कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था पाहण्यासाठी खासदार आणि पालकमंत्र्यांनी एकदा कोल्हापूर शहरातून बुलेट सवारी करावी, असा टोला संजय पवारांनी लगावला.
हेही वाचा -
- मागील 25 वर्षात तुम्ही फक्त मुंबईला लुटलं; शिवसेना नेत्यांचं आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
- आदित्य ठाकरे देश सोडून जाण्याची शक्यता, लूकआऊट नोटीस जारी करावी-नितेश राणे यांची मागणी
- मुंबईची लूट दिल्लीश्वरांच्या आदेशाने, आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका