कोल्हापूर : 2006 मध्ये आनंद बनसोडे, कुंदन बनसोडे यांनी कोल्हापुरातील शिये इथे एचआयव्हीबाधित बालकांचे संगोपन करण्याला सुरुवात केली. ज्या वयात कौतुक व्हायला पाहिजे त्या वयात कोवळ्या जीवांना निराधार व्हावे लागले. अशा निराधार एचआयव्ही बाधित बालकांचे गेली 19 वर्षांपासून बनसोडे दाम्पत्य संगोपन करत आहेत. पोटच्या गोळ्याला जेवढे प्रेम देतो, त्याच प्रेमाने करुणालयातील एचआयव्ही बाधित लेकरांची कुंदन बनसोडे काळजी घेत आहेत. करूणालय या एचआयव्ही बाधित बालगृहातील 35 मुलांच्या सकाळच्या आंघोळीपासून कुंदन यांच्या दिनचर्याची सुरुवात होते. या मुलांच्या शाळेचा डबा, कपडे धुण्यापासून ते त्यांच्या अभ्यासापर्यंत कुंदन यांनी या कामात स्वतःला वाहून घेतलं आहे. स्वतः पदव्युत्तर पदवी, एमएसडब्ल्यू पर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी कुठेही मोठ्या हुद्द्यावर नोकरी केली असती. मात्र, समाजातील उपेक्षित, रंजल्या-गांजलेल्या, निराधार बालकांची माऊली होऊन करूणालय या एचआयव्हीबाधित बालकांच्या संगोपनाचा गाडा नेटाने हाकने बनसोडे दांपत्यांने जीवनाचे ध्येय ठरवले आहे.
त्या 35 मुलांना मायेची सावली :एचआयव्हीचा विषाणू पोटात घेऊन जगणाऱ्या कोवळ्या बालमनांना आपण बहिष्कृत आहोत याची पुसटशी कल्पनाही नसते. जग न समजणाऱ्या वयामध्ये ना आई, ना वडील, माझं लेकरू म्हणून सांभाळ करणारे ही रात्रीच्या अंधारात करूणालयात सोडून जातात. अशा आतापर्यंत 200 हुन अधिक आणि सध्याच्या घडीला 35 मुलांची मायेची सावली कुंदन बनल्या आहेत. एचआयव्ही एड्सचे नाव जरी घेतले तरी, अनेकांना कापरे भरते. मात्र, या आजाराने ग्रासलेल्या लहानग्यांचे आयुष्य बहरतानाच घरच्यांनीच निराधार केलेल्या बालचमुंची कुंदन या मनोभावे सेवा करतात. गेली 19 वर्ष हे व्रत त्यांनी अखंड सांभाळले आहे.
समाजानेच केली शिक्षणाची दारे बंद :आपण पुढारलो आहोत, या मानसिकतेत असलेल्या समाजामुळेच एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी झगडावे लागत आहे. शिक्षण घेताना एचआयव्ही बाधितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचा प्रवेश होतो मात्र, तो फक्त कागदावर राहतो, शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अन्य मुलांच्या पालकांच्या दुजाभाव वृत्तीमुळे एचआयव्ही बाधितांना शाळेत प्रवेश नाकारल्याची अनेक उदाहरणे आहेत. या मुलांच्या अडचणी शासन दरबारी सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव देखील दिसतो. परिणामी अनेक बाधितांच्या शिक्षणाची दारे बंद झाली आहेत.
कन्यादानही कुंदन आईनेच करण्याचा हट्ट :एचआयव्ही बाधित बालकांचे आश्रयस्थान असलेल्या करूणालय बालगृहात आत्तापर्यंत एचआयव्ही पॉझिटिव्ह 18 वर्षावरील मुलगी, 21 वर्षांवरील मुलांचे सात ते आठ विवाह लावले गेले. या विवाहप्रसंगी करुणालयात 18 वर्षापर्यंतचे आयुष्य व्यतीत केलेल्या मुलीने सरकारी अधिकारी कन्यादान करताना पाहून तिने प्रश्न उपस्थित केला. आतापर्यंत आई-वडिलांनीही ढुंकूनही पाहिले नाही. मात्र, करुणालयातील कुंदन बनसोडे या निराधारांच्या माऊलीने माझे कन्यादान करावे, असा हट्ट तिने धरल्याची आठवण कुंदन बनसोडे यांनी सांगितले.