कोल्हापूर- प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे, हा वाक्यप्रचार आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र, कोल्हापुरात प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. येथील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या हातातील ४ तोळ्यांच्या बांगड्या रुग्णालयातूनच चोरीला गेल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार शिवाजी पार्कमधल्या सनराईज रुग्णालयामध्ये घडला आहे.
सखूबाई मलगोंडा कांबळे (वय ६५) यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा शीतल नेजकर यांनी त्यांना गावावरून कोल्हापूरमध्ये उपचारासाठी बोलावले होते. त्यानुसार सखूबाई या कोल्हापुरात आल्यानंतर नेजकर यांनी त्यांना त्यांच्या पारिवारिक डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. मात्र, सखूबाईची प्रकृती बिघडल्याने त्यांना १२ जुलैला शिवाजी पार्क येथील सनराईज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी सखूबाईंचा मृत्यू झाला.