कोल्हापूर- सध्या राज्यात हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. हजारो उमेदवार नशीब अजमावत आहेत. या उमेदवारांमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते कोल्हापूर जिल्ह्यातील गिजवणे गावच्या 75 वर्षीय हौसाबाई कांबळे यांनी. त्या देवदासी असल्याने जोगवा मागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शाळेची पायरीही न चढलेल्या हौसाबाईंना निवडणूक लढण्याची हौस आहे. तीही गावाच्या विकासासाठी. गिजवणेची ग्रामपंचायत 1952 ला स्थापन झाली, त्याही अगोदर हौसाबाई कांबळे यांचा जन्म झाला आहे. गावातील गटारी, रस्ते कामे करायची आहेत. लोकांची पडलेली घरे बांधून द्यायची आहेत, गल्लीतील माणसे आपल्याच पाठीमागे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या इर्षेन उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील हीच ईर्ष्या पाहायला मिळाली. एकीकडे प्रत्येक उमेदवार मोठा गाजावाजा करत अर्ज दाखल करण्यासाठी येत होते, त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील श्रेष्टी विद्यालयावर अर्ज करण्यासाठी गीजवणे गावची 75 वर्षीय हौशाबाई कांबळे पोहचली. गिजवणे गावातील हौशाबाई कांबळे या देवदाशी असून गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आणि नातवंडे आहेत. स्वत: यल्लामा देवीची भक्त आणि देवदाशी असल्याने त्या गावात जोगवा मागतात. या निमित्ताने त्याचा गावात चांगला जनसंपर्क आहे. त्याचाच विचार करून त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.