कोल्हापूर :कोल्हापूरात झालेल्या 70 वर्षाच्या वृद्धांच्या विवाहसोहळ्याची चर्चा सर्वत्र आहे. त्याचे झाले असे की, येथील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड मधील जानकी वृद्धाश्रमात अनुसया शिंदे (वय 70, रा. वाघोली, जि. पुणे) आणि बाबूराव पाटील (वय 75, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) हे दोघेही राहत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते या ठिकाणी आपल्या आयुष्यातील उरलेले क्षण आनंदात जगत आहेत. दोघांचेही जोडीदाराचे निधन झाल्यानंतर ते याच वृद्धाश्रमात राहत आहेत. याच दरम्यान, दोघांची एकमेकांच्या नजरेला नजर भिडली, एकमेकांशी ओळख झाली अन् या वयात सुद्धा आपण पुढे जाऊन लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी अगदी धुमधडाक्यात या दोघांचा विवाह पार पडला आहे.
धुमधडाक्यात लग्न लावून दिले :दरम्यान, वृध्दापकाळात नातेवाईक वाऱ्यावर सोडले की, आपल्या आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले तर वृध्दाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदुःखी वृद्ध वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृध्दाश्रम चालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धुमधडाक्यात लग्न लावून दिले. या वेगळ्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.