कोल्हापूर:दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र आणि अपंग कार्ड देण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येते. याच माध्यमातून कोल्हापूरात आजपर्यंत किती दिव्यांग व्यक्तींनी अर्ज केले ? किती व्यक्तींना प्रमाणपत्र मिळाली आणि किती अपात्र झाले ? या संदर्भात आपण आज या विशेष रिपोर्टमधून माहिती जाऊन घेणार आहोत.
जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी 51 हजार जणांनी केला अर्ज दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया: महा-ई-सेवा केंद्रात जाऊन किंवा आपल्या घरात सुद्धा कोणीही swavlambhancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता. ज्यामध्ये दिव्यांगांच्या 21 कॅटेगिरीमध्ये अर्ज करू शकतो. यासाठी आधारकार्ड, आयकार्ड साईज फोटो, रेशन कार्ड, सही किंवा अंगठा शिवाय जुने प्रमाणपत्र असेल, तर ते सुद्धा अपलोड करावे लागते. ही सगळी कागदपत्रे देऊन या संकेतस्थळावरती सविस्तर अर्ज भरला जातो. हा अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून संबंधित विभागात सादर करावे लागते. अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित विभागाकडून तपासणीसाठी फोन किंव्हा मॅसेज केले जातात. संबंधित व्यक्तीला तपासणीसाठी एक तारीख दिली जाते.
30 दिवसांचा कालावधी:त्यानुसार तपासणी होऊन त्यांना पात्र किंवा अपात्र असे प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या नियमानुसार त्यांच्या दिव्यांगत्वाची टक्केवारी ठरवली जाते. यासाठी तज्ञ डॉक्टर नेमले गेले असतात. या सगळ्या प्रक्रियेला एक सात ते 30 दिवसांचा कालावधीही लागू शकतो. जिल्ह्यात किती जणांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार हा वेळ लागू शकतो. त्याचे प्रमाणपत्र त्यांना ऑनलाईन मिळते. त्याची प्रिंट काढावी लागते. शिवाय युनिक डिसॅबिलिटी आयडी ही पोस्टद्वारे संबंधित व्यक्तीला त्याच्या घरी मिळते.
जिल्ह्यातील सद्यस्थिती: दरम्यान ईटीव्ही भारतची प्रतिनिधी शेखर पाटील यांनी स्वतः संबंधित विभागात भेट देऊन एकूण दिव्यांग व्यक्तींच्या दाखल केलेले अर्जाबाबत माहिती घेतली. आणि एकूणच परिस्थिती जाणून घेतल्यानंतर समजले की, कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत 51 हजार 142 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील जवळपास 30 हजार 172 प्रमाणपत्र वितरित केले आहेत. कागदपत्रांच्या त्रुटीमुळे दिव्यांगासाठी अपात्र झालेले किंवा संबंधित व्यक्तीला वेळोवेळी कळवून सुद्धा ते तपासण्यासाठी हजर झाले नाहीत, असे 17 हजार 800 लोक आहेत.
विशेष कॅम्प सुद्धा राबविण्यात आले: त्यातील जवळपास 7 ते 8 हजार ते केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये बसत नसल्याने अपात्र करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये मूकबधिर आणि अंध तसेच अस्थिविंग यांचा समावेश आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 3 हजार जणांना अद्याप प्रमाणपत्र मिळू शकले नसले, तरी त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून विशेष कॅम्प सुद्धा राबविण्यात येत आहे. अजूनही कोणाला या संदर्भात तक्रार असेल तर संबंधित विभागात येऊन याबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.