कोल्हापूर -जोतिबा यात्रेसाठी 21 मानकऱ्यांच्या केलेल्या कोरोना चाचणीत 5 मानकरी पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच जोतिबा डोंगरावरही अनेक पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने आता पारंपरिक विधीवरही कोरोनाचे सावट दिसत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जोतिबाच्या चैत्र यात्रेला 21 मानकऱ्यांच्या उपस्थितीत परवानगी दिली होती. मात्र, त्यातील 5 मानकरी पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे. शिवाय मीडियालाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
उरलेल्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पूजा पार पडण्याची शक्यता -
चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केवळ 21 मानकऱ्यांच्या उपस्थितीत जोतिबा चैत्र यात्रेला परवानगी देण्यात आली होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यातील सर्वच 21 मानकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय जोतिबा डोंगरावरसुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत.
पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा जवळपास 20 टक्क्यांवर आहे. त्यामुळे जे निर्बंध होते त्यामध्ये आणखीनच कडक नियमावली बनविल्याचे समजले असून पत्रकारांनाही यंदा जोतिबा डोंगरावर सोडले जाणार नाही. जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणालाही जायला परवानगी नाही.