कोल्हापूर -जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. कोल्हापुरात सोमवारी तब्बल 41 बाधितांचा मृत्यू झाला. तर 843 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच दिवसभरात 411 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 749 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 63 हजार 917 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाचीसुद्धा चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 63 हजार 917 वर पोहोचली आहे. त्यातील 54 हजार 57 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 749 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 111 झाली आहे.