कोल्हापूर -चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर बुजवडे येथील पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सुमारे साडेतीन हजार पक्षांचा मृत्यू झाला आहे. तर 70 पोती कोंबडी खाद्याचे नुकसान झाले आहे. यामध्ये अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाले असल्याने पोल्ट्री व्यवसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी चंदगड तालुक्यातील नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. पूर ओसरला असला, तरी झालेल्या जखमा भरून निघणे कठीण असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
सुमारे 6 लाखांपेक्षा जास्त नुकसान -
चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर व बुजवडे येथे पुराच्या पाण्याचा फटका पोल्ट्री व्यवसायिक राजेंद्र तुकाराम मरगाळे व नारायण सगन धामणेकर यांना बसला आहे. महापुराचे पाणी पोल्ट्रीत शिरल्याने सुमारे एक व दीड किलो वजनाच्या 3 हजार 500 पक्षांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून अनेक पक्षी वाहून गेले आहेत. शिवाय पोल्ट्री शेडमध्ये ठेवण्यात आलेले जवळपास 70 पोती कोंबडी खाद्यही पाण्यातून वाहून गेले आहे. यामध्ये या व्यावसायिकांचे सुमारे 6 लाख 10 हजार 666 रुपयाचे नुकसान झाले आहे. महापुरामुळे चंदगड तालुक्यातील हे दोन पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. दरम्यान, सलग तिसऱ्या वर्षी नागरिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आलेल्या या संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
हेही वाचा - बसवराज बोम्माई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड