कोल्हापूर - इचलकरंजी परिसरात खुनाची एक घटना घडली असताना अवघ्या २४ तासांच्या आत आणखीन एक घटना उघडकीस आली आहे. इचलकरंजी येथील कत्तलखाण्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या माळरानामध्ये एका युवकाचा निर्घुण खून करण्यात आला आहे. मृताची ओळख आणि हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, इचलकरंजी शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला असून याकडे पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी शहरवासीयांकडून मागणी होऊ लागली आहे.
इचलकरंजी येथे आणखी एकाचा निर्घृण खून इचलकरंजी येथे गुन्हांचे सत्र सुरूचइचलकरंजी शहरात गंभीर गुन्हांचे सत्र वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काल (मंगळवार) रात्री कोरोची येथे झालेली हत्या ताजी असताना आज (बुधवार) परत एक हत्या झाल्याचे निदर्शनास आले. कत्तलखाण्याच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या माळरानामध्ये एका युवकाचा अज्ञातांनी निर्घुण खून केल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बी.बी. महामुनी यांनी पाहणी केली. त्यानंतर गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना या हत्येचा उलघडा करण्यासाठी विविध पथके रवाना करण्याच्या सूचना दिल्या.
महिलांच्या निदर्शनास आला मृतदेहआज (मंगळवार) सकाळच्या सुमारास काही महिला शेतामध्ये जात असताना एका युवकाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या महिलांनी आरडाओरडा केला. गोळा झालेल्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, घटनास्थळी 'फॉरेन्सिक लॅब'च्या पथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते.
२४ तासांत दुसरी घटनाइचलकरंजी येथील कोरोची माळावर २१ वर्षांच्या शुभम कमलाकर या तरुणाच्या डोक्यात सीमेंटचा खांब मारून निर्घृण हत्या करण्यात आली होती. काल मंगळवारी सायंकाळीच ही घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच आज (बुधवारी) पुन्हा दुसरी घटना घडली आहे. गेल्या २ ते ३ महिन्यात अशा, अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याच्या स्थानिकांमधून भावना व्यक्त होत आहेत.