कोल्हापूर - जिल्ह्यातून 56 जण दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी जमातीच्या मेळाव्यात गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी कोल्हापूरात परतलेल्या 10 जणांना 1 एप्रिल रोजी पोलिसांनी शोधून काढले होते. त्यानंतर आता आणखी 16 जणांचा प्रशासनाने शोध घेतला असून त्यांना सुद्धा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. शोधलेले सर्व 16 जण कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील नागरिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
कोल्हापूरातील 56 जणांची तबलिगी जमात मेळाव्याला हजेरी, 26 जणांचे क्वारंटाईन - कोरोना विषाणू
तबलिगी मेळाव्याला उपस्थित 56 पैकी कोल्हापूरला परतलेल्या 26 जणांना आत्तापर्यंत क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
तर उर्वरीत 30 जणांपैकी 21 जणांना दिल्लीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 9 जण विविध राज्यांमध्ये गेले असून त्यांना त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले असल्याचेही देसाई यांनी सांगितले आहे.
दिल्लीतील तबलिगी मेळाव्यात 13 ते 15 मार्च दरम्यान कोल्हापुरातल्या 19 लोकांच्या एका गटाने उपस्थिती लावल्याची यादी प्रशासनाला मिळाली होती. त्यापैकी परतलेल्या 10 जणांना पोलिसांनी तत्काळ शोधून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, कोल्हापूरातील 21 जणांना दिल्लीमध्ये तिथल्या सरकारने क्वारंटाईन केले असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता आणखीन 16 जण त्या कार्यक्रमाला हजेरी लावून कोल्हापूरात परत आल्याची माहिती मिळताच त्या सर्व 16 जणांचा शोध घेतला आहे. हे सर्व 16 जण 16 मार्चच्या दरम्यान कोल्हापुरात परत आल्याचे स्पष्ट झाले आहेत. यांच्यामध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत.