कोल्हापूर- मे महिन्याच्या सुट्टीत करवीर निवासिनी अंबाबाईच्या पदरात भक्तांनी भरभरून दान दिले आहे. एका महिन्यात अंबाबाईच्या चरणी तब्बल 1 कोटी 7 लाखांचे दान जमा झाले आहे. आतापर्यंत एका महिन्यात जमा होणाऱ्या देणगींचा विक्रम मोडला आहे. त्यामुळे शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर याप्रमाणे आता अंबाबाईच्या भक्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई चरणी एका महिन्यात विक्रमी 1 कोटी 7 लाखांचे दान करवीर निवासिनी अंबाबाईला भक्तांनी यंदाच्या मे महिन्यात सर्वाधिक दान दिले आहे. मे या सुट्टीच्या महिन्यात 1 कोटी 7 लाखांच्यावर भक्तांनी देणगी दिली. इतक्या मोठ्या प्रमाणात एका महिन्यात दान जमा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाच्या यादीत अंबाबाई अग्रस्थानी आहे. लोकसभा निवडणुका असल्याने मार्च आणि एप्रिलमध्ये भाविकांची संख्या कमी होती. मात्र, मे महिन्याच्या सुट्टीत भक्तांची संख्या वाढली आणि देवीच्या खजिन्यातदेखील मोठी देणगी जमा झाली. देवस्थान समिती देवीच्या खजिन्यात जमा होणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरत असते. आरोग्य विभाग, शालेय विभाग, विविध संघटनांना देवस्थान समिती निधी देते. सामाजिक कार्यासाठी देवीच्या खजिन्यातील रकमेची तरतूद केली असल्याचे अध्यक्ष सांगतात.
अशाच पद्धतीने भक्तांची संख्या वाढून देवीच्या खजिन्यात वाढ व्हावी. ज्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करता येईल. याआधी महिन्याला ६० ते ७० लाख इतके दान जमा होत असे, आता हा आकडा कोटीच्या पुढे पोहोचला आहे