महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharudra Maruti Mandir : अभिनेत्री हेमा मालिनींच्या स्वप्नात आले होते महारुद्र मारुती; जाणून घ्या मंदिराची अख्यायिका - MAHARUDRA MARUTI MANDIR

रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महारुद्र मारुती तेथे आले होते, अशी यामागे अख्यायिका आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. अधिक सविस्तर 'या' रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Maharudra Maruti Mandir
महारुद्र मारुती मंदिर संस्थान जहागीरपुर (Maharudra Maruti Mandir)

By

Published : Mar 28, 2023, 3:38 PM IST

Updated : Oct 20, 2024, 12:42 PM IST

अमरावती :सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांना जहागीरपूर येथील जागृत श्री महारुद्र मारुती यांनी स्वप्नात दर्शन दिल्याचे सांगितले जाते.अमरावतीमध्ये प्रसिद्ध जागृत महारूद्र मारूतीचे मंदिर आहे. विशेष म्हणजे हेमामालिनी मुंबईवरून जहागीरपुरला आल्या होत्या. त्यावेळी या मंदिरात येण्यासाठी अमरावती ते कौंडण्यपूर मार्गावरून आतमध्ये रस्तादेखील नव्हता. हेमा मालिनी यांनी या रस्त्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले होते.

हेमा मालिनी आल्या होत्या दर्शनाला : त्यावेळी हा रस्ता बांधण्यासाठी हेमा मालिनींनी लोकप्रतिनिधींना विनंती केली. राज्य शासनाने या रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे यासाठी संपूर्ण निधी हेमामालिनी यांनी दिला होता. या रस्त्याचे काम पूर्ण होताच रस्त्याच्या उद्घाटनासह जहागीरपुर येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी हेमामालिनी पुन्हा एकदा 1991 ला आल्या होत्या. मंदिरापर्यंत थेट पक्का रस्ता तयार झाल्यामुळे भाविकांना मंदिरात येणे सुविधेचे झाले. 1995 मध्ये सिनेअभिनेता मनोज कुमार हे देखील जहागीरपुर येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी आले होते.

'अशी' आहे आख्यायिका : यामागे आख्यायिका अशी की, द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाल्यावर बाळ कृष्णाची भेट घेण्यासाठी श्री हनुमान गेले होते. श्रीकृष्णाची भेट झाल्यावर त्यांनी रुक्मिणी मातेबाबत चौकशी केली. भगवंताने रुक्मिणी माता कुंडीलपूर अर्थात आताचे अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथे असल्याचे हनुमंताला सांगितले होते. त्यामुळे रुक्मिणीच्या दर्शनासाठी श्री हनुमान कौडण्यपूरला आले. रुक्मिणी मातेची भेट झाल्यावर मातेने त्यांना याच परिसरात थांबायला सांगितले. तेव्हापासून श्री हनुमान कौडण्यपूर लगत असणाऱ्या जहागीरपूर येथे येऊन वसले, अशी आख्यायिका आहे. साडेचारशे वर्षांपूर्वी या परिसरात श्री महरुद्र मारुतीचे हनुमानाचे वास्तव्य असल्याचे समोर आले. या ठिकाणी जमिनीतून प्रकटलेल्या जागृत हनुमानाचे मंदिर उभारण्यात आले आहे.

'असे' प्रकटले स्वयंभू हनुमान : जहागीरपूरपासून काही अंतरावर अमरावती कौडण्यपूर मार्गावर मार्डा हे गाव आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी या गावातील नानासाहेब देशमुख यांचे कौडण्यापूर लगतच्या जंगल परिसरात 1400 एकर शेत होते. या शेतात काम करणाऱ्या मजुरांना एक दिवस गवत कापत असताना विळ्याला रक्त लागलेले दिसले. साप, विंचू तर मारला गेला नसावा म्हणून मजुराने पाहिले असता त्या ठिकाणी काहीही आढळून आले नाही. काहीही नसताना मिळाला रक्त लागलेले पाहून मजुरांना आश्चर्य वाटले. हा संपूर्ण किस्सा त्यांनी गावात जाऊन नानासाहेब देशमुखांना सांगितला. यानंतर नानासाहेब देशमुख यांनी शेतात येऊन त्या ठिकाणी खोदकाम करायला लावले. तेव्हा जमिनीतून श्री हनुमानाचा भव्य मुखवटा बाहेर निघाला.

भव्य मंदिर उभारण्यात आले :देशमुख यांच्या शेतात हनुमान पकडल्याची माहिती परिसरात पसरली. अनेकजण या ठिकाणी दर्शनासाठी आले. त्यावेळी हनुमानाच्या मूर्तीवर लाकडी छत उभारण्यात आले. हनुमानाच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक यायला लागले. हळूहळू मंदिर परिसरात जहागीरपुर नावाचे गाव वसले. आज या ठिकाणी स्वयंभू हनुमानाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. जागृत असणाऱ्या या हनुमानाच्या दर्शनासाठी अमरावती जिल्ह्यासह लगतच्या वर्धा, नागपूर आणि मध्य प्रदेशातून देखील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. विदर्भातील अनेक कुटुंबीयांसह मध्यप्रदेश, गुजरात उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक कुटुंबियांचे जहागीरपूर येथील जागृत हनुमान हे कुळदैवत असल्याची माहिती मंदिरातील पुजारी परमानंद पांडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. हा हनुमान भाविकांच्या इच्छा पूर्ण करतो, अशी मान्यता असल्याचेदेखील परमानंद पांडे म्हणाले.

भक्तांसाठी रोज महाप्रसाद : श्री हनुमानाचे जागृत असे स्थान म्हणून ओळख असणाऱ्या जहागीरपुरला दर शनिवारी आणि मंगळवारी यात्रेचे स्वरूप येते. या दोन्ही दिवशी शेकडो भाविक श्री महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी येतात. इतर दिवशी देखील अनेक भाविक जहागीरपुरला येतात. हनुमान जयंतीला भव्य उत्सव जहागीरपूर येथील श्री महारुद्र मारुती मंदिरात साजरा होतो. श्री हनुमानाच्या दर्शनासाठी दररोज येणाऱ्या शेकडो भाविकांसाठी मंदिर संस्थांनच्या वतीने प्रत्येक दिवशी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. मंदिर संस्थांनच्या वतीने भाविकांसाठी निवासासह उत्तम असे भोजन कक्ष उभारले आहेत. विविध वृक्ष आणि हिरवळीने प्रफुल्लीत अशा बागेमध्ये अनेक भाविक स्वतः स्वयंपाक करतात. जागृत असणाऱ्या श्री महारुद्र मारुती मंदिराचे वैभव हे शेगाव आणि शिर्डी सारखेच व्हावे, अशी आमची इच्छा आणि प्रयत्न असल्याचे मंदिरात तीस वर्षांपासून पुजारी असणारे परमानंद पांडे म्हणाले.

हेही वाचा : Hanuman Mandir Pendgaon: बीडमधील 'या' ठिकाणी आहे एकाच मंदिरात दोन हनुमानाच्या मूर्ती; जाणून घ्या, सविस्तर

Last Updated : Oct 20, 2024, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details