जालना- गटविकास अधिकाऱ्याने विहिरींच्या अनुदानामध्ये शेतकऱ्यांकडून साडेतीन कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप भाजप जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके यांनी स्थायीच्या बैठकीत केला. या रकमेत अधिकाऱ्यांनाही वाटा देऊन बदली करुन घेतल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या आरोपाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
घनसावंगीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी तालुक्याला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शेतकऱ्यांना गोठे आणि विहिरींसाठी प्रशासकीय मान्यता दिली. ही मान्यता देत असताना सर्व नियम धाब्यावर बसवून प्रत्येक शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये घेतले. गोठ्यासाठी आणि विहिरीसाठी ही नियमबाह्य मान्यता दिली. यामधून या गटविकास अधिकाऱ्यांने साडेतीन कोटींची रक्कम कमवली. ही रक्कम जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना वाटून हा गटविकास अधिकारी फरार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.