जालना - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सामान्यांसाठी लोकप्रिय ठरल्या निमा अरोरा -
कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या निमा अरोरा या सामान्य माणसांसाठी मात्र लोकप्रिय ठरल्या होत्या. 18 फेब्रुवारी 2018 ला जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार त्यांनी घेतला. सुरुवातीला वर्षभर जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्यासोबत घूमजाव करत राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्याच वर्षी त्यांनी तो हाणून पाडला. कायद्यावर बोट दाखवत त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद सदस्यांचे मनसुबे उधळले गेले. सर्वसाधारण सभेमध्ये खटके उडू लागले. मात्र, त्यांना न जुमानता "माझी चौकशी लावा" असे म्हणण्याची हिंमत देखील निमा अरोरा यांनी दाखवली. चौकशी लावण्याची हिंमत जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नव्हती.
महिला सक्षमीकरणात अग्रेसर -
एक महिला या नात्याने महिलांनी स्वावलंबी व्हावे, सक्षम व्हावे यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार होता." उमेद "या महिला सक्षमीकरणाच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले, आणि त्यातून महिलांना सक्षम बनविले. आजही ही बचत गटांची ईमारत ही निमा अरोरा यांनी घालून दिलेल्या पायावरच उभी आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी विविध उपक्रम राबवत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन केले. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा या उदात्त हेतूने जिल्हा क्रीडा प्रबोधिनी ची स्थापना केली. या क्रीडा प्रबोधिनीच्या खर्च सरकार कडून न घेता शिक्षकांच्या मदतीने निधी उभा केला. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना निमा अरोरा या आपल्याशा वाटू लागल्या.
साधी राहणी -
अधिकाऱ्याचा कोणताही बडेजाव न करता जो बोलावेल त्याच्या कडे जाण्याची तयारी निमा अरोरा यांची असायची. वेळप्रसंगी अंगावर आहेत त्या कपड्यावरच त्या जात असायच्या. आणि कार्यक्रमात गेल्यानंतर, गडबडीमध्ये आले त्यामुळे तेच कपडे राहिले असे आवर्जून सांगायच्या देखील. त्यांच्या या साध्या रहाणीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसायचा मात्र त्यांनी त्याची कधी पर्वा केली नाही. कधीही प्रसिद्धीच्या मागे पडल्या नाहीत.
ग्रामसेवकामध्ये उत्साह -
निमा अरोरा यांची बदली झाल्याचे कळताच शेअर बाजारांमध्ये जशी शेअर्सनी उसळी मारावी तशा प्रकारचा आनंद ,उत्सव जालना जिल्ह्यातील ग्रामसेवकांना झाला आहे. ऑनलाइन काम करण्याच्या निमित्ताने आणि ग्रामपंचायतचे सर्व कामकाज ऑनलाइन करण्याच्या तगद्याने ग्रामसेवक हैराण झाले होते. कामचुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांना घराची वाट त्यांनी दाखवली होती. त्यांच्या या धाकामुळे अनेक गावांचा विकास देखील झपाट्याने झाला आहे. मात्र, कामाची सवय नसलेल्या ग्रामसेवकांना ते जड जात होते म्हणूनच त्यांची बदली झाल्या मुळे ग्रामसेवकांनी आज जल्लोष साजरा केला आहे.