जालना -एका 17 वर्षाच्या अल्पवयीन विवाहित मुलीला रोहनवाडी येथील एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी रेल्वे स्थानक परिसरातील 39 वर्षीय आव्हाड यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, या विवाहितेने तिच्या मुलाला यापूर्वीच पतीकडे ठेवलेले आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात फूस लावून पळवून नेल्याचा आरोप असणाऱ्या तरुणाने या मुलीला यापूर्वी देखील पळवून नेले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, या मुलीचा 14व्या वर्षीच विवाह झाला होता आणि तिला लहान मुलदेखील आहे. त्यावेळी ही माहेरी आली आणि पुन्हा सासरी गेलीच नाही. त्यामुळे या विवाहितेच्या पतीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पतीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण तिथेच दबले. त्यानंतर या विवाहितेने मुलाला पतीकडे सोडून या तरुणासोबत पलायन केले होते. मात्र, पुन्हा तिला घरी आणण्यात आले.