जालना - जिल्हा परिषद जालन्यात आज(सोमवार) झालेल्या विषय समितीच्या सभापती पदासाठीच्या निवडणुकीत चारही सभापतीपदे महिलांच्या ताब्यात गेली आहेत. त्यामुळे आता अधिकार्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत जिल्हा परिषदेत महिला कारभाऱ्यांची संख्या वाढली आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज(सोमवार) दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये समाज कल्याण सभापतीपदी सईदाबी अब्दुल रौफ परसूवाले, महिला व बालकल्याण सभापतीपदी आयोध्या जयप्रकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर, उर्वरित २ सभापती पदांसाठी ३ अर्ज आले असल्यामुळे निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अवधूत खडके यांचा पराभव होऊन प्रभा विष्णू गायकवाड आणि पूजा कल्याण सपाटे यांचा विजय झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या चारही सभापतीपदी आता महिला विराजमान झाल्या आहेत.