वाल्हा धरणात महिला बुडाल्याचा संशय; शोध सुरू - वाल्हा धरण महिला मृ्त्यू न्यूज
सोमठाणा येथे एक महिला पाण्यात बुडाल्याची शक्यता आहे. ही महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून वाल्हा धरणात तिचा शोध सुरू आहे.
जालना -सोमठाणा येथील एक महिला दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. या ४१ वर्षीय महिलेच्या चपला व इतर साहित्य वाल्हा येथील सोमठाणा लघु प्रकल्पाजवळ आढळल्या. त्यामुळे ही महिला पाण्यात पडली असल्याचा किंवा तिने आत्महत्या केल्याचा संशय आहे. मच्छिमार बोटींच्या सहाय्याने पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला आहे.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील मंदाबाई शिवगिर गिरी (वय ४१) ही महिला दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. अनेक ठिकाणी शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. दरमयान आज, वाल्हा येथील सोमठाणा लघु प्रकल्पाच्या पाळूजवळ त्या महिलेच्या चप्पला व इतर साहित्य आढळले. गावातील कैलास मेंढरे, प्रभू भंडारे, सकलादी बावणे, अण्णा भंडारे आदी हे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेचा शोध घेत आहेत. प्रकल्पात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत.