जालना- आरोग्य विभागातील विविध पदाची परीक्षा अचानक रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर आरोग्य विभागाचा प्रमुख आणि मंत्री म्हणून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा आयत्यावेळी रद्द कराव्या लागल्याच्या निर्णयावर दिलगिरी व्यक्त केली. तसेच न्यासा संस्थेच्या हलगर्जीपणामुळे परीक्षा रद्द करावी लागली, त्यामुळे न्यासाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.
न्यासा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. या प्रकाराने अनेक परीक्षार्थींना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे या प्रकरणी उद्याच बैठक घेऊन आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करणार आहे. तसेच न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्ट मधीस कंपनी नाही, किंवा तिला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलेले नाही, तिच्या निवडीचा अधिकार पूर्णता आयटी विभागाचा असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आज आणि उद्या होणारी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही. तर ती पुढे ढकलली आहे, असेही टोपे म्हणाले. आता 8-10 दिवसांतच परीक्षा घेणार आहोत. मात्र आज जो प्रकार घडला आहे, त्यास वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या न्यासा कंपनीचा दोष असल्याचेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.