बदनापूर (जालना) -तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा कोरडवाहू शेती बागायती करता येणार आहे. दुधना मध्यम प्रकल्पातून धरणातील पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करूण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे धोपटेश्वर, बदनापूर व देवगाव शिवारातील शेतकऱ्यांनी २०० हेक्टर जमिनीसाठी पाण्याची मागणी नोंदविली आहे. शनिवारी १९ डिसेंबरला सोमठाणा धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दुधना प्रकल्पातून कालव्याला सुटणार पाणी: बदनापूर तालुक्यातील 200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार - News about farm water in Jalna
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेतीसाठी दुधना प्रकल्पासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. यापाण्यामुळे २०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
![दुधना प्रकल्पातून कालव्याला सुटणार पाणी: बदनापूर तालुक्यातील 200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार Water will be released to the canal from Dudhna project](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9924069-996-9924069-1608292432653.jpg)
बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून पावसाचे अत्यल्प आगमन होत असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांची पिके दरवर्षी वाया जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत होते. या भागातील शेतकरी वर्ग कर्ज बाजारी होत गेला आहे. दरवर्षी हवामान खाताच्या अंदाजानुसार चांगला पाऊस दाखविला जात असल्याने शेतकरी वर्ग बँका, सोसायट्या व खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन शेतात पेरणी करून महागडे बी बियाणे, खते खरेदी करतो. दरवर्षी पदरी घोर निराशा येत होती. मात्र, यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावली. विशेष म्हणजे तालुक्यात अतिवृष्टी देखिल झाली व तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा सोमठाणा दुधना मध्यम प्रकल्प तुडुंब पाण्याने भरून वाहत आहे. यामुळे तालुक्यातील राजेवाडी, अन्वा धरण देखील यंदा भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सोमठाणा दुधना धरण भरल्याने यंदा या धरणाखाली येणाऱ्या जमिनींना फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी गहू, जवारी, हरभरा आदी पिकांची लागवड केली आहे. दुधना प्रकल्प विभागाकडे पिकांसाठी पाण्याची मागणी केली असता अप्पर दुधना मध्यम प्रकल्प सोमठाणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. प्रकल्प विभागाने शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी सोडण्याची मंजुरी दिली. यानंतर तालुक्यातील सोमठाणा धरणाखालील शेतकऱ्यांनी २०० हेक्टर जमिनीची नोंदणी करून आवश्यक शुल्क भरले असून दुधना प्रकल्प विभागाने पाणी सोडण्यासाठी सोमठाणा, अंबडगाव, देवगाव, कस्तुरवाडी पर्यंत पाठाची स्वछता पूर्ण केली आहे. शनिवारी१९ डिसेंबर रोजी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कोरडवाहू जमिनी बागायती होणार असून यंदा या धरणाखालील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे, हे मात्र निश्चित