जालना - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. याप्रकरणी बदनापूरातील 11 दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा होऊ नये, यासाठी प्रशासन वारंवार सूचना देत आहे. मात्र, बदनापूर शहरात अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचेच दिसून येत आहे.
जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी 21 आणि 22 मार्चला गर्दी होऊ नये, या उद्देशाने दक्षता घेण्यासाठी आवश्यक सेवा देणारे प्रतिष्ठाने वगळून बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे अनेक कार्यालयाच्या विभागांना सुट्टी असल्याने नागरिक एकत्र येत बैठका रंगवीत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच कलम 144 लागू करण्यात आलेली असताना बदनापूर शहरातील काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडी ठेवत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी 11 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. इसार बेग रसूल बेग, शेख कलीम चौधरी, शेख सांडू, रुपेश रवींद्र गंभीरे, हर्ष कटारिया, प्रसाद उदवंत, शेख नईम, संजय लिंबाजी आठवे, राजू खोलकर, योगेश कोलते आणि जावेद कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.