जालना - शुभ कार्यासाठी लागणारे मंगल कार्यालय, वस्तू भांडार, आचारी, वाजंत्री, यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारल्यामुळे आधीच उपासमारीची कुराड कोसळलेल्या या व्यवसायिकांना आंदोलनाचा देखील हक्क मिळाला नाही.
कोरोना महामारी मुळे देशांतर्गत व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी टेन्ट हाऊस, मंडप डेकोरेटर्स, मंगल कार्यालय, वाजंत्री, छायाचित्रकार, फुलवाले फेटेवाले, घोडे पुरविणारे, अशा अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे त्यांचे व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भारत सरकारने पन्नास लोकांच्या उपस्थितीत शुभ कार्य करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र ही संख्या अपुरी असल्याचे वस्तू भांडार असोसिएशनचे मत आहे. यावेळी जालना वस्तू भांडार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश मगरे, सचिव पुरुषोत्तम जयपुरिया, यांच्यासह मधुसूदन झंवर, रत्नाकर कंधारकर, सतीश अग्रवाल, सुनील लाहोटी, मिलिंद नाईक, रवींद्र देशपांडे, सुनील पिसाट, अनिल व्यवहारे गौतम वाघमारे, नाज मंडप डेकोरेशन आदींची उपस्थिती होती.