जालना - राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान शासनाने जाहीर केले. हे अनुदान वाढवून हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी आठ हजारांची तर फळबागांसाठी अठरा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम वाढवून खरीप पिकासाठी हेक्टरी पंचवीस हजार आणि फळबागांसाठी पन्नास हजार इतकी करावी. जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांबरोबर शेतमजुरांनाही भरपाई व मोफत धान्य वाटप करण्यात यावे. वीज बिलात सूट आणि त्वरित पीक विमा देण्यात यावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना निवेदन देण्यात आले.