जालना - वंचित बहुजन आघाडीला देखील लोकसभा विधानसभेमध्ये निवडून येण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे ते शक्य झाले नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दिली. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते रविवारी पहिल्यांदाच जालन्यात आले होते.
चंद्रकांत हंडोरे यांची वंचित बहुजन आघाडीवर प्रतिक्रिया वंचितचा स्वबळाचा नारा -
वंचित बहुजन आघाडीला लोकसभा आणि विधानसभेमध्ये मिळालेल्या संधीचे सोने करता आले असते. आज त्यांचे 25-30 आमदार आणि चार पाच मंत्री झाले असते. परंतु त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे जातीयवादी शक्तींनी तोंड वर काढले आणि त्यांना बळ मिळाले. त्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. खरेतर दलित समाजाची ताकद मोठी आहे. आम्ही आमच्या ताकतीवर सत्तेत येऊ शकत नाहीत. मात्र सत्तेत कोणाला आणायचे आणि कोणाला बाहेर काढायचे ते आम्ही ठरवू शकतो. त्यामुळे आता अशा प्रकारच्या जातीयवादी शक्तींना थारा दिला जाणार नाही, असे चंद्रकांत हांडोरे म्हणाले.
जातीवाद काँग्रेसच रोखू शकते -
सध्या जातीयवादी शक्तींनी डोके वर काढले आहे. त्यांना रोखण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे. दलित समाजाच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले आहे. म्हणून दलित समाज मोठ्या प्रमाणात विशेष करून वंचित आघाडीतील नेते आता काँग्रेस सोबत आले आहेत. याचा फायदा काँग्रेसला होईल. तसेच जातीयवादी शक्ती रोखण्यासाठी याचा उपयोग होईल, असा आशावादही चंद्रकांत हांडोरे यांनी व्यक्त केला. तर सध्या चर्चेत असलेला औरंगाबाद नामांतराचा प्रश्न संभाजीनगर की औरंगाबाद या विषयाला देखील त्यांनी बगल दिली.