जालना- अल्पवयीन मुलीवर काकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मावशी आजारी असल्याचा बहाणा करून मुलीला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या काकाने (मावशीचा नवरा) तब्बल 24 दिवस विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना चंदनजिरा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या आरोपी काकाला शुक्रवारी औरंगाबादच्या बस स्थानकातून ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : आरोपीला न्यायालयीन कोठडी; मध्यरात्रीच न्यायालयीन कामकाज
जालन्यातील एका 17 वर्षांच्या मुलीला तुझी मावशी आजारी आहे आणि ती एका रुग्णालयात असून तिला भेटण्यासाठी सोबत येण्यास सांगत आरोपी काकाने 14 जानेवारीला त्या मुलीला मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर नातेवाईकांनी या मुलीचा इतरत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही न सापडल्याने पालकांनी 23 जानेवारीला चंदनजिरा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांनी विविध पथके तयार करून मुलीचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी काकाकडे असल्याचे लक्षात आले. मात्र, आरोपीजवळ संपर्क करण्यासाठी कोणताच मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे हे प्रकरण अवघड झाले होते.
दरम्यान, ६ फेब्रुवारीला आरोपी काकाने त्याच्या पत्नीला दुसऱ्याच्या मोबाईलवरून संपर्क साधून सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील पूर्णा रेल्वे स्थानकावर बोलावले. परभणीकडे जाण्यासाठी जालना रेल्वे स्थानकावर वाट पाहत बसलेल्या पत्नीला परत एका तासाने फोन करून औरंगाबाद येथील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर भेटण्यासाठी बोलावले. तिथे पोलिसांनी सापळा लावला. मात्र, त्यामध्ये आरोपी सापडला नाही. त्याने परत आपले ठिकाण बदलले. परंतु, पोलिसांची खात्री पटली होती की, तो औरंगाबाद येथेच आहे. त्यामुळे पोलिसांनी 24 तास औरंगाबाद बस स्थानकावर पहारा लावला. यावेळी आरोपी काका हा पोलिसांच्या हाती लागला.
हेही वाचा -सिपना नदीचे खळखळणारे पाणी, निसर्गाच्या सौंदर्याची उधळण अन् कोलकास विश्रामगृह...
शुक्रवारी औरंगाबाद येथील बस स्थानकातून जालना पोलिसांनी त्याला आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले. मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. ती म्हणाली, काकाने मला मावशी आजारी असल्याचे सांगून सोबत नेले आणि मला व मावशीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जालन्याहून मंठा, मंठाहून मेहकर येथे जाणाऱ्या बसने मेहकरला नेले व तेथून एका रिक्षामध्ये बसवून उखळी येथे मावशीकडे नेले. आम्ही तिथे काही दिवस राहिलो. त्यावेळी त्यांनी मला एका खोलीमध्ये कोंडून ठेवले होते. त्या दरम्यान काकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
दरम्यान, पीडितेने दिलेल्या या जबाबावरून चंदनजिरा पोलिसांनी विविध कलमावरून आरोपीला अटक केली आहे. हा तपास लावण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सुनील इंगळे, अनिल काळे, गोपाळ सत्तवण, महिला पोलीस कर्मचारी स्वाती शरणांगत यांनी प्रयत्न केले.