जालना -जमिनीच्या वादातून पुतण्यांनीच काकाचा खून केल्याची घटना जालना तालुक्यातील मांडवा परिसरात घडली. हे गाव जालना तालुक्यात येत असले तरी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. रतनराव खंडाळे असे मृत काकाचे नाव आहे.
काय आहे जमिनीचा वाद -
या प्रकरणातील फिर्यादी गौतम रतनराव खंडाळे 25, याचे वडील रतनराव खंडाळे हे शेळ्या विक्रीसाठी गेले होते. या विक्रीमधून आलेले दीड लाख रुपये हात उसने घेतलेल्या गावातील पाटलाचे परत करण्यासाठी ते जात होते. याच वेळी या प्रकरणातील आरोपी त्र्यंबक गिरजा खंडाळे 55 ,रवी त्र्यंबक खंडाळे 30, गणेश त्र्यंबक खंडाळे 25, सतीश त्रंबक खंडाळे 23, संदीप उत्तम खंडाळे 25 ,यांनी रतनराव खंडाळे यांची मोटरसायकल रस्त्यात अडवली आणि शेतीच्या वाटणीवरून व जुने भांडण काढून काठीने व तलवारीने मारहाण करून त्यांना ठार मारले. त्यांच्याजवळ शेळ्या विकून आलेले दीड लाख रुपये पळवून नेले .
जमिनीच्या वादातून पुतण्यांनीच केली काकाची हत्या, दीड लाख रुपयेही लांबविले
जमिनीच्या वादातून पुतण्यांनीच काकाचा खून केल्याची घटना जालना तालुक्यातील मांडवा परिसरात घडली आहे. पाच आरोपींनी काकाची मोटारसायकल रस्त्यात अडवून काठी व तलवारीने मारहाण करत त्यांचा खून केला.
जालन्यात हत्या
याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून इतर आरोपी फरार आहेत त्यांचा तपास पोलीस घेत आहेत.