जालना - चारा छावणीसोबतच जनावरांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. ती शिवसेना घेत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
उद्धव ठाकरेंचे जालन्यात आगमन झाले असता कार्यकर्त्यांनी त्यांना बैलगाडीत बसण्यास सांगितले. त्यांच्यासाठी बैलगाडीही सजवण्यात आली होती. परंतु त्यांनी बैलगाडीत बसण्यास नकार दिला. हा नकार का दिला, याचा खुलासा त्यांनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचं दु:ख मोठं आहे. त्यांना यातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. आणि आम्ही सरकारमध्ये आहोत त्यामुळे हे ओझं आमच्यावरही आहे. माझ्यावर असलेलं हे ओझं मला त्या बैलांच्या डोळ्यात दिसलं. मला हे ओझं त्यांच्यावर टाकायचे नाही. म्हणून मी बैलगाडीत बसणे टाळले.