जालना - जिल्ह्यामध्ये कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप आलेले नाहीत. यापूर्वीही एक रुग्ण रुग्णालयात भरती झाला होता. मात्र, त्याचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. सध्या जिल्ह्यात फक्त दोन संशयित आहेत. असे असले तरीही जनतेने घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
CORONA : जालना जिल्ह्यात कोरोनाचे दोन संशयित रुग्ण - corona patients found in Jalna
जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. हे लक्षात घेता जिल्ह्यातील आठवडे बाजार, लग्नासाठीचे मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे अशा ठिकाणचे सर्व कार्यक्रम बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
हेही वाचा...कोरोना इफेक्ट : शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद, पुढील आदेश येईपर्यंत राहणार बंद
कोरोनासोबत लढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. त्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आदी यंत्रणा काम करत आहेत. नागरिकांनीदेखील एकत्र येण्याचे टाळावे. शक्यतो आपल्या घरी बसूनच काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे. या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड आदींची उपस्थिती होती.