जालना -पाण्यात बुडत असलेल्या पुतण्याला वाचविण्यासाठी काकाने पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील घाणेवाडी तलावात आज (मंगळवारी) घडली. परमेश्वर भानुदास खंडागळे (५०) व रोहित कृष्णा खंडागळे (१८, दोघे रा. मांडवा), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
घाणेवाडी तलावात काका पुतण्याचा बुडून मृत्यू
शेतात काम करत असलेले परमेश्वर खंडाळे धावत आले. त्यांनी पुतण्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्यात असताना घाबरलेल्या रोहितने परेश्वर यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
जालना जवळील घाणेवाडी तलावाच्या मांडव्याकडील बाजूने रोहित खंडागळे हा नेहमीप्रमाणे गुरे चारत होता. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असूनवरील बाजूने मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाल्याने ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. गुरे चारत असताना तलावाच्या काठावर असलेल्या रोहितचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्यामुळे सोबतच्या मुलांनी आरडाओरडा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जवळच शेतात काम करत असलेले परमेश्वर खंडाळे धावत आले. त्यांनी पुतण्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्यात असताना घाबरलेल्या रोहितने परेश्वर यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेत दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक उपनिरीक्षक आर. पी. वाघमारे अधिक तपास करत आहेत.