बदनापूर (जालना) -औरंगाबादवरून दुचाकीने निघालेल्या दाम्पत्याला मागून भरघाव वेगात येणाऱ्या अर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याची घटना बदनापूरजवळ सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. रामेश्वर चव्हाण (४५) आणि इंदुबाई चव्हाण (४२) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून हे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेड येथील रहिवासी होते.
धडक दिल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून काढला पळ -
रामेश्वर चव्हाण हे आपल्या पत्नीसह औरंगाबादवरून गावी जाण्याकरिता सकाळी १० च्या सुमारास निघाले. ते बदनापूर येथील पाथ्रीकर महाविद्यालयाजवळ ११ वाजेच्या सुमारास पोहचले असता, भरघाव वेगात येणाऱ्या अर्टिगा कार (क्रमांक एम.एच. ०४ ए.एफ.९३९१ ) या गाडीने रामेश्वर यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना बदनापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, धडक दिल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग करत त्यांना नागेवाडी टोल नाक्याजवळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा - उत्तराखंड निवासस्थान घरभाडे प्रकरण : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा